बँक लॉकर उघडला आणि.. ऍड. रोहित एरंडे ©
बँक लॉकर उघडला आणि..
ऍड. रोहित एरंडे ©
रुक्ष वाटणाऱ्या, किचकट कायद्यांचा अभ्यास कराव्या लागणाऱ्या वकीली व्यवसायातही कधी कधी हसवणुकीचे / मजेशीर प्रसंग येतात..
आणि कोर्टात माणसांचे मुखवटे गळून खरे चेहरे दिसून येतात..
एखाद्य जागेची पाहणी करण्या करता, एखादा साक्षीदार आजारपणामुळे कोर्टात साक्ष घ्यायला येऊ शकत नसेल, तर त्याची साक्ष नोंदवायला "कोर्ट कमिशनर" ची नेमणूक केली जाते. थोडक्यात एखाद्या वकीलाची नेमणूक कोर्ट अशी कामे करण्यासाठी करते आणि बहुतेकवेळा ज्युनिअर वकीलांना असे काम दिले जाते. जेणेकरून त्यांना अनुभवही मिळतो आणि कामाचे थोडे पैसेही मिळतात. अशीच वकिलीची उमेदवारी करताना मला एका कामामध्ये कोर्ट कमिशनर म्हणून नेमण्यात आले. विषय होता वारसा हक्क प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट ) मिळण्याचा. आपल्या कैलासवासी वडिलांच्या बँक लॉकरमध्ये काय काय ठेवले आहे हे बघण्यासाठी त्यांची चारही मुले उत्सुक होती, परंतु लॉकर एकट्या वडिलांच्या नावाने असल्यामुळे चावी असून देखील लॉकर उघडता येत नव्हता आणि बँकेने देखील वारसा हक्क प्रमाणपत्र आणण्यास सांगतिले होते. त्यामुळे कोर्टाने माझी "कोर्ट कमिशनर" म्हणून नेमणूक करून सर्वांसमक्ष लॉकर उघडून त्यामध्ये जे काय मिळेल त्याचा अहवाल द्यायला सांगितले होते. ह्याच दरम्यान लॉकरची चावी हरवली असे ज्येष्ठ बंधूंनी कोर्टात सांगितल्यामुळे कोर्टाने सर्वांसमक्ष लॉकरचे लॉक फोडून तो उघडण्याचा हुकूम केला. असे लॉक उघडणाऱ्या (अर्थातच कायदेशीर पद्धतीने ) कंपनीच्या तज्ज्ञ व्यक्तींची त्याकाळी कमतरता होती आणि त्यांची अपॉइंटमेंट देखील २-३ महिन्यांनी मिळत असे, पण अखेर ती मिळाली.
ठरलेल्या दिवशी सकाळी ११ चे सुमारास सर्व पक्षकार, बँकेचे मॅनेजर आणि मी बँकेत जमा झालो. आता लोकर उघडायचाच अवकाश, आपलया वडिलांनी मोठे घबाड ठेवलेले असणार आणि त्यांचे मृत्युपत्र देखील त्यातच असणार अशी कुजबुज भावंडांमध्ये चालू होती. सुमारे अर्धातासानंतर लॉकर उघडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्या कारागिराने सगळयांना ओरडून सांगतिले, "चला आता मी लॉकरचा दरवाजा उगढणार आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या'. 'डोळ्यात प्राण आणणे ' म्हणजे काय, हे मी त्या दिवशी बघितले.. आणि अखेर तो लॉकरचा, पर्यायाने अनेकांच्या आशा आकांक्षांचा, दरवाजा खाडकन उघडला आणि ... आणि... त्या आशा आकांक्षा खाडकन मावळल्या देखील.. त्या पक्षकारांचे चेहेरे तर खर्रकन उतरले.. कारण लॉकर पूर्णपणे मोकळा होता. आत एक फुटकी कवडी किंवा कागदाचा कपटा देखील नव्हता.. बँक मॅनेजर खूप प्रयत्नाने हसू आवारात होता कारण लॉकर उघडण्यासाठी पूर्वी त्याचे डोके त्या पक्षकारांनी खाल्ले होते. मी त्या प्रमाणे रिपोर्ट तयार केला आणि सर्वांची सही घेतली आणि रिपोर्ट कोर्टात दाखल केला.
पुढे केसचे काय झाले हे माहिती नाही. पण बँकेतून बाहेर पडताना सर्व बंधू चेहऱ्यावरचा संताप लपवू शकत नव्हते आणि जे आधी छातीठोकपणे 'घबाड ' मिळेल असे सांगत होते, तेच बाहेर पडताना "मला मनातून वाटत होतेच, अप्पा काहीही ठेवणार नाहीत' असे बोलत होते... कोर्टामध्ये मानवी स्वभावाचे खरे नमुने बघायला मिळतात हे खरे. ह्यावरून शेवटी मी जाता जाता असे सांगू इच्छितो, जे मी माझ्या इतर लेखांतूनही सांगितले आहे कि, 'मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते, त्यामुळे वेळेत मृत्यूपत्र करणे हिताचे असते आणि बँक लॉकर शक्यतो एकाच्याच नावावर ठेवू नये..
धन्यवाद..
ऍड. रोहित एरंडे ©
पुणे.
Comments
Post a Comment