इगोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो, ...पण लक्षात कोण घेतो.. (कोर्टातील कटू सत्य)
किस्से कोर्टातले !
गोष्ट दोन सख्ख्या भावांची.
#इगोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो - पण लक्षात कोण घेतो ?. (कोर्टातील कटू सत्य)
ॲड.रोहित एरंडे.©
कोर्ट हे असे ठिकाण आहे जेथे लोकांचे मुखवटे गळून जातात आणि खरे चेहेरे समोर येतात. या अश्या बरेचदा माणसे अशी का वागतात हा प्रश्न कायमच भेडसावतो. या अश्या घटनांमधून आणि इतरांच्या चुकांमधून म्हणा किंवा अजून काही, आपल्याला काही शिकता आले, आपले विचार बदलले तर उत्तम. तर कोर्टातील अश्या वेगवेगळ्या किश्श्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू.
दोन सख्खे - ज्येष्ठ नागरिक -उच्च विद्याविभूषित भाऊ. वडिलांनी बांधलेल्या एकाच बंगल्यात खाली वर राहणारे. पण जागेवरून भांड-भांड भांडले. सासरे लवकर गेल्यावर वृध्द सासूबाईंकडे कडे कोण बघणार म्हणून दोन्ही जावा-जावांमध्ये भांडणे. लहान मुलांना सुध्दा एकमेकांशी खेळायला बंदी !! सर्व प्रकारच्या तक्रारी कोर्टात करून झाल्या. पण प्रश्न काही सुटला नाही.
दैवयोगे मोठ्या भावाला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे समजले. आम्ही भेटायला गेल्यावर हातात हात घेऊन, डोळ्यात पाणी आणून आम्हाला म्हणाले, "वकील साहेब, तुमचे तेव्हा ऐकले असते की 'कशाला कोर्टात भांडताय, एक पाऊल मागे घ्या,' तर बरे झाले असते., "आज माझा सख्खा भाऊ पण मला बघायला आला नाही. उगाच आयुष्यभर भांडलो, आमची दोन्ही कुटुंबे दुरावली.. पण आता वेळ गेल्यावर काय उपयोग ?"
नंतर थोड्याच दिवसांत थोरल्या भावाचे निधन झाले आणि वैकुंठात विधी चालू असताना धाकटा भाऊ आलं आणि हमसून हमसून रडू लागला आणि थोरल्या भावाला हार घालताना म्हणाला "दादा, माझे चुकले, उगाच भांडलो.. आयुष्यभर हि रुखरुख कायम राहील !!"
वकीली व्यवसायात आपल्या पक्षकाराचे पारडे किती जड आहे हे लक्षात आल्यावर कधी कधी आम्ही पक्षकारांना "तडजोड करून बघा, एक पाऊल मागे या, कोर्टात भांडायचे आहे, का जे आहे त्याचा उपभोग घ्यायचा ?" असा सल्ला दिला तर आमच्याकडून कागद घेऊन गेल्याची उदाहरणे आहेत. पण वरच्या केससारखे नंतर पस्तावून काय उपयोग ?
त्यात हल्ली नवीन पिढीला बऱ्याचवेळा या जुन्या लोकांच्या भांडणांशी काही सुख -दुःख नसते, त्यांना वेळी नसतो, मग कोणासाठी आपण भांडतोय हेही लक्षात घेणे महत्वाचे आहे. अर्थात प्रत्येक केसच्या फॅक्टस वेगळ्या असतात आणि त्यामुळे प्रत्येकवेळी तडजोड होईलच असे अजिबात नाही. असो.
कोर्टातील काय किंवा कुठलेही, बहुतांशी वाद हे इगो मुळे झालेले असतात, पण त्यातील फोलपणा कळेपर्यंत वेळ गेलेली असते. यातून इतरांनी योग्य तो बोध घ्यावा. एकवेळ सगळी सुखे विकत घेता येत येतील, पण गेलेली वेळ आणि मानसिक शांतता विकत घेता येत नाही !!
ॲड. रोहित एरंडे ©
पुणे.
Comments
Post a Comment