#किस्सेकोर्टातले... जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान..- ऍड. रोहित एरंडे ©
#किस्सेकोर्टातले.
"जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान.."
"आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये आई वडिलांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो."
- ऍड. रोहित एरंडे ©
सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे 'पक्ष-विधी' करत असतात.
मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..आई - वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते.
आमचे एक जुने पक्षकार होते. नवरा -बायको दोघेही नोकरी करीत आणि या पैश्यातून छोटेखानी बंगला बांधला आणि त्यात ते सुखाने राहत होते. एकुलता एक मुलगा. अमेरिकेत नोकरी मिळाली आणि इकडे लग्न करून बायकोबरोबर तिथेच स्थायिक झाला. मध्येच त्या मुलाला PhD करायची हुक्की आली, पण त्याची फी खूप जास्त होती आणि त्याला ती परवडत नव्हती. ..
म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून टाका आणि त्याचा हिस्सा त्याला द्यावा. आई - वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्यानंतर हा बंगला तुलाच मिळणार आह , अशी भांडणे शोभत नाहीत आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहेआणि त्यांची राहण्याची दुसरी कुठलीही सोया नाही.. पण व्यर्थ.. (मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ.. )
त्याचे आई-वडील आमचे जुने पक्षकार. म्हणून मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला ..
मी म्हटले, तुम्हाला आवडेल असा सल्ला देता येणार नाही, तर योग्य तो सल्लाच देईन आणि तो असा की "आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये आई वडिलांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो."
नंतर मुलाने आई वडिलांशी संबंधच तोडून टाकले, ना फोन ना मेसेज , आई-वडील मात्र वेड्या आशेने नातवंडांच्या फोनची वाट बघायचे..
नंतर सुमारे ७-८ महिन्यांनी वडील आजारी पडले आणि गेले आणि नंतर १-२ महिन्यांत लगेचच आई पण गेली, पण एकाच्याही आजारपणाला किंवा अंत्यविधीला हे चिरंजीव त्यांच्या " कार्यबाहुल्यामुळे" येऊ शकले नाहीत !!
आमच्याही ही गोष्ट विस्मृतीत गेली. नंतर एक - दोन वर्षांनी गणपतीच्या सुमारास त्या मुलाचा मला फोन आला की, "सर मी या पितृपंधरवड्यामध्ये पुण्याला येतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे.." त्या प्रमाणे तो आला आणि विचारले की, "आई वडिलांनी काही विल करून ठेवले आहे का?, मी सांगितले, माझ्याकडे तरी नाही.. पण मी विचारले की अहो, तुम्ही आता अचानक कसे काय आलात, आई वडील गेल्यावरही आला नाहीत ?
तो म्हणाला, " अहो काय सांगू, You know I'm trying hard for PhD admission but not been able to get through for some or the other reason... आणि आता बंगल्याचे पण काहीतरी करायला हवे ना ?
नंतर म्हणाला, "अजून एक कारण आहे..खरे तर माझा या श्राद्ध पक्ष, ज्योतिष या गोष्टींवर काही विश्वास नाही.. पण अहो आई-बाबा गेल्यावर ना आमच्याकडे सतत आजारपणे, माझ्या नोकरीत भांडणे, PHD admission मध्ये अडचणी, असे प्रकार चालू आहेत, मग माझ्या बायकोने तिच्या आईच्या सांगण्यावरून कोणाला तरी ऑनलाईन पत्रिका दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले की आई वडिलांचे श्राद्ध वगैरे केले तरच हे प्रकार थांबू शकतील, म्हणून आता बायकोच्या हट्टाखातर आलोय" असे तो म्हणाल्यावर मी निःशब्द झालो.. .
मनात म्हटले, "Poetic Justice किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतात तो हाच की काय ? आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी भांडायचे, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला ही यायचे नाही आणि आता हे प्रकार करायचे. "जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान" ही म्हण आज प्रत्यक्षात बघितली..
असे किंवा त्यासारखे प्रकार कोर्टात घडताना दिसतात आणि नात्यापेक्षा पैशाला किंमत जास्त आहे असे दिसून येते.. पण असे करून सुख किंवा मानसिक शांतता लाभते का ?
मला तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते... What goes around comes around हे खरे..आई-वडिलांनी देखील आपल्या हयातीमध्ये मृत्युपत्र करून ठेवणे इष्टच. "जेवताना ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये" या म्हणीचा अर्थ उतारवयात जास्त समजतो.
ॲड. रोहित एरंडे. ©
विदारक वास्तव
ReplyDelete