(पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना... ॲड. रोहित एरंडे. ©
#किस्सेकोर्टातले #वंशाचादिवा #किस्सेमृत्युपत्राचे
(पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना...
ॲड. रोहित एरंडे. ©
वडिलांना हाताला धरून ती माझ्या ऑफिस मध्ये आली. वडिलांना बसतानाही धाप लागत होती. सख्खा धाकटा भाऊ परदेशी असल्यामुळे, आपल्या नोकरीच्या व्यापातूनही, तीच वडिलांची काळजी घेत होती. वडील उच्चशिक्षित, मोठ्या पदावरून निवृत्त झालेले ! वडिल मृत्यूपत्र करण्यासाठी आले होते. त्यांनी तिला हळूच बाहेर जायला सांगितले. मग एका कागदावर त्यांनी कोणाला काय काय द्यायचे लिहून आणले होते. त्यातील एका वाक्याने मी आश्चर्यचकित झालो.
"मी मुलीला तिच्या लग्नात सगळे काही (म्हणजे दागिने इ.) दिले आहे आणि लग्नाचा खर्चही केला आहे, म्हणून मी तिला काही देऊ इच्छित नाही आणि तिनेही हे गोड मानून घ्यावे".
अर्थातच सर्व मिळकती त्यांनी कोणाला दिल्या असतील हे सांगायची गरज नाही. मी त्यांना न राहून विचारले, मुलाचे लग्न कसे केले, त्यावर लगेच ते म्हणाले , अर्थातच धूम धडाक्यात, भरपूर खर्च केला, आमचा एकुलता एक मुलगा - वंशाचा दिवा आहे तो..
मग मुलीला हाक मारली आणि तिचा हात धरुन डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी निघाले...
आपली स्वकष्टार्जित मिळकत मृत्युपश्चात कोणाला द्यायची हा ज्याचा त्याचा हक्क असतो आणि म्हणूनच मृत्यूपत्र करतात, नाहीतर वारसा हक्काने सर्व वारसांना समानरित्या हक्क मिळतो.
अर्थात सगळीकडे असाच प्रकार असतात असे अजिबात नाही, उलटे प्रकारही असतात .तरीही अशी (बऱ्याचदा येणारी !) वाक्ये आणि मिळकत, संपत्ती आली की माणसांची अजब वर्तणूक मला कायमच विचारात पाडतात. ..असो.
ॲड. रोहित एरंडे. ©
तुमच्या आधीच्या लेखात बक्षिस्पत्रात मुलीने परस्पर आजोबांची सही कशी घेतली त्याबद्दल लेख आहे. त्याच्या विरुद्ध हा लेख आहे की वडील मुलीला त्यांच्या प्रॉपर्टी पासून लांब ठेवू इच्छित आहेत कारण त्यांच्या म्हणण्यानुसार तिचं लग्न केलं आणि त्यात खर्च केला. तो खर्च करायची गरज होती नव्हती तो भाग कोणी विचारात घेत नाही
ReplyDeleteदुसरी गोष्ट म्हणजे भारताची लोकसंख्या इतकी झालेली असूनसुद्धा लोक मुलीच्या पाठी मुलगा असावा किंवा 2 मुलं असावीत या आग्रहाचे बळी आहेत. पण त्यात भेदभाव करत मुलांना मोठ करणार ..या आजोबांना वंशाची 2 मुलं असती तर पण असच वागू शकले असते का??