#किस्सेकोर्टातले #आईवडील का #करिअर ? ॲड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले #आईवडील का #करिअर ?

ॲड. रोहित एरंडे. ©

मुले परदेशात आणि आई वडील इथे, असे चित्र आता घरटी बघायला मिळते. स्वतःचे करिअर, आयुष्य असतेच पण त्यापुढे आई वडिलांप्रती  कर्तव्ये दुय्यम असतात आणि तुमचे तुम्ही बघा  असे वाटणारे प्रसंग वकीली व्यवसायात कधी कधी बघायला मिळतात. त्यातील हा एक..

तीनही मुले उच्च शिक्षित आणि 'Uncle Sam' च्या देशात स्थायिक.. आई वडील ५ स्टार वृद्धाश्रमात.. आमच्या पक्षकारांनी त्या आई वडिलांचा एक मोठा ३ बी.एच. के. फ्लॅट विकत घ्यायचा ठरविला, जो त्यांनी ३  मुलांसाठी ठेवला होता... व्यवहार ठरला. किंमत ठरली. त्याच सुमारास ' दैवयोगाने ' मोठा मुलगा त्याच्या एका कॉन्फरन्स साठी २ दिवसांसाठी पुण्यात येणार होता.  
 आमचा रजिस्टर  करारनामा बँकेत दिल्यावर बँक त्यांना डी.डी. देणार होती आणि मग आम्हाला ताबा मिळणार होता. 
ह्या सगळ्या प्रकारात मुलगा त्याच्या कामात बिझी होता आणि तो दुसऱ्या दिवशी आई वडिलांनी फ्लॅटचा ताबा आमच्या पक्षकारांना देण्याच्या वेळी, फ्लॅट वरच आई वडिलांना उभ्या उभ्या भेटून तिथूनच मुंबईला जाणार होता, कारण दुसऱ्या दिवशीचे पहाटेचे त्याचे बिझनेस क्लासचे तिकीट बुक होते !
तर ठरल्याप्रमाणे आमच्या पक्षकाराला सर्व सोपस्कार होऊन  दुपारी ४ चे सुमारास फ्लॅटचा ताबा मिळाला, त्यांनी पेढे दिले आणि आम्ही सगळे खाली उतरलो. पण मुलगा नेमका 'कामात अडकल्यामुळे ' येऊ शकला नाही. तो फोनवरच   थोड्या वेळ आई बाबांशी बोलला. आईच्या डोळ्यात दाटून आले होते आणि आवाजही जड झाला होता. तो तिथूनच मुंबईच्या वाटेवर निघाला.
इकडे त्या आजी पण वृद्धाश्रमात जायला निघणार तेवढ्यात त्यांच्या एकदम लक्षात आले की त्यांची पर्स फ्लॅट मध्ये राहिली आहे. म्हणून त्या घाई घाईत निघाल्या आणि तेवढ्यात त्यांचा पाय कशात तरी अडकून त्या जोरात खाली  पडल्या. आम्ही सगळे लगेच धावलो. त्यांच्या डोक्याला चांगलेच लागले होते आणि त्यांची शुध्द हरपली होती,  हात फ्रॅक्चर झाला होता.. आजोबा तर बावचळून गेले होते. आम्ही लगेच त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आणि प्राथमिक तपासणीनंतर हाताचे  ऑपरेशन करावे लागेल आणि डोक्याला मार लागल्यामुळे सिटी - एम आर आय टेस्ट कराव्या लागतील आणि १ दिवस तरी आय सी यू मध्ये ठेवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले.
बरं ,आता त्यांच्या जवळचे फक्त आजोबा होते.  इतर नातेवाईक कोणी नाही. बाकी आम्ही आणि आमचे पक्षकार. निर्णय कोण घेणार ? 
मग आम्ही आजींच्या फोन वरून त्या मुलाला फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला आणि परत यायची विनंती केली.. पण मुलगा जे म्हणाला ते शब्द आजही कानात घुमत आहेत ,"ओह बापरे, anything serious? पण तुम्ही आहात ना, पैश्याची काही काळजी करू नका, सर्व ट्रीटमेंट नीट होईल असे बघू, पण सॉरी I cannot come back. You know I have a flight to catch and got an important meeting over there. Very sorry, I'll call later, tell Baba" असे म्हणून फोन ठेवला. 
ग्राम्य भाषेत वाकताडन करावे असे वाटले. 
मनात आले, काय दुर्दैव आई वडिलांचे..
जिवंतपणी अन्न अन्न आणि मेल्यावर पिंडदान, असा प्रकार होता.
इकडे ते फ्लॅट विकून आलेले पैसे  तिन्ही मुलांच्या नावे बँकेत ठेवणार होते.
 शेवटी काय, कोणाचे कोणावाचून अडत नाही. पुढची ट्रीटमेंट नीट झाली, थोडे दिवसांनी आजी वृद्धाश्रमात परत गेल्या.

वर नमूद केले तसे आता आई वडील एकीकडे आणि मुले दुसरीकडे, असे चित्र सगळीकडे आहे आणि इथल्या प्रॉपर्टीचे काय करायचे असा यक्ष प्रश्न असतो. 
बरेच वेळा धरवतही नाही आणि सोडवतही असे आई वडिलांचे होते आणि त्यांच्याच्याने  वयोपरत्वे होत नाही आणि मुले येथे येण्याची शक्यता वर्षागणिक मावळत जाते. 
तर कधी कधी मुलांचीही, करिअर का आई वडील, अशी द्विधा मनस्थिती झालेले असते. 

हे चांगले का वाईट ह्यावर काही २+२ असे गणिती उत्तर असू शकत नाही आणि कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. 
पण कारणे काही असोत, हा ज्वलंत प्रश्न हळू हळू घरटी निर्माण होत आहे आणि ह्यावर प्रत्येकाने वेळीच भावनांच्या आधरी  न जाता  मार्ग काढणे गरजेचे आहे. असो. 

 मुले परदेशात असतील आणि असा काही प्रकार झाला तर समजू शकतो की ते लगेच येऊ शकत नाहीत. पण आई ICU मध्ये , वडील वृद्धाश्रमात, बाकी कोणी नातेवाईक नाहीत तरीही  आईला सोडून  गेलेला असे चिरंजीव कोणाच्या पाहण्यात नसतील.

पुढे महिन्याभराने त्या महाशयांचा पक्षकाराला फोन आला की ह्या कराराची एक झेरॉक्स FedEx कराल का ? चिडून उत्तर आले "तुमचा काय संबंध ? हवे असेल तर भारतात येऊन घेऊन जा" ... पुढे उत्तर आले नाही... 
असो. अशी वेळ कोणावरही येऊ नये..

ॲड. रोहित एरंडे. ©
पुणे.

Comments

  1. That was a very good article. I really loved the way you explained the articles. Apart from this, I need your expertise in judging my article, as you are an experienced lawyer. you can also see the articles written by me and give me a review on that Section 341 IPC in Tamil

    ReplyDelete
  2. That was a very good article. I really loved the way you explained the articles. HOWEVER, I need your expertise in judging my article, as you are an experienced lawyer. you can also see the articles written by me and give me a review on that Section 341 IPC in Marathi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#किस्सेकोर्टातले. जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान..- ऍड. रोहित एरंडे ©

इगोच्या भांडणात जो हरतो तो जिंकतो, ...पण लक्षात कोण घेतो.. (कोर्टातील कटू सत्य)